सातारा : मागील हंगामात साखर कारखान्याला गेलेल्या ऊसाला दिवाळीपूर्वी दुसरा हप्ता पाचशे रुपये द्यावा आणि यंदा सुरु होणाऱ्या हंगामाची पहिली उचल चार हजार रुपये द्यावी या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. पाटण दौऱ्या दरम्यान बळीराजा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीसमोर जय जवान जय किसान अशी घोषणाबाजी केली. या हंगामाची पहिली उचल चार हजार रुपये द्यावी, अन्यथा सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने सुरु होवू देणार नाही, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेने दिला आहे.
मुख्यमंत्री शिंदे पाटण दौऱ्यावर असताना बळीराजा शेतकरी संघटनेने त्यांना मागण्यांचे निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना ते निवेदन देण्यास अटकाव केल्याने संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर घोषणाबाजी केली. बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गणेश शेवाळे, सातारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश जिरंगे, प्रहार जनशक्तीचे शुभम उबाळे, बळीराजा शेतकरी संघटनेचे दिगंबर जगताप, संपत जगताप व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. दरम्यान, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील म्हणाले, बळीराजा संघटना उसाला योग्य भाव मिळवून घेण्यासाठी आक्रमक आंदोलन करणार आहे.