विंग (जि. सातारा) : गेल्या वर्षी दुष्काळ आणि महापूर यामुळे ऊस उत्पादनावर परिणाम झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा गाळप हंगाम लवकर सुरु करण्याच्या हालचालींचे नियोजन सुरु आहे. त्या दृष्टीने ऊस उत्पादन वाढवणे हा मुद्दा कळीचा बनला आहे. त्यानुसार मुंढयात “सुपर केन नर्सरी’ चा प्रयोग करण्यात आला आहे. कराड तालुका कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली ऊस रोपे निर्मितीसाठी हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.
हा प्रयोग खूपच फायदेशीर ठरत आहे. केवळ 60 ते 70 पैशाला रोप तयार होत आहे. मुंढे येथील शेतकरी संभाजी साळवे यांच्या शेतावर हा प्रयोग केला आहे. त्यात तीन फूट रुंद व गरजेनुसार लांबी ठेऊन बेड तयार केली आहेत. 86032 या वाणाची निवड त्यांनी केली आहे. ही पद्धत शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायदेशीर ठरेल असे त्यांनी सांगितले.
या प्रयोगात एक डोळा पद्धतीने कांड्या तयार करून कीटकनाशक व बुरशीनाशक द्रावणात बुडवल्या. 24 तास प्रक्रिया केल्यानंतर बेडवर रिकामी पोती अंथरून प्रक्रिया केलेल्या कांड्या काढून एकाला एक जोडून पोत्यावर अंथरून घेतल्या. यानंतर त्यावरअसितोबॅक्टेरियाची व ट्रायकोड्रमाची फवारणी केली. फवारणी झाल्यावरअर्धा इंच मातीत कुजलेले शेणखत मिसळून त्यावर चढवून कांड्या बुजवल्या. गरजेनुसार दररोज रात्री झारीने पाणी दिल्यानंतर दोन आठवड्यांनी त्यावर कोंब फुटले.
साळवे यांनी केलेल्या या प्रयोगाने ऊसाची उगवण क्षमता 95 टक्के झाली आहे. तालुका कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी चार एकरांमध्ये ही नर्सरी तयार केली असून, तब्बल 27 हजार रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रयोगासाठी त्यांना 14 हजार खर्च आला. तर एक रोप 60 ते 70 पैसे पडले आहे.
साळवे यांना उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ, तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला, मंडलाधि अशोक कोळेकर, कृषी सहायक एम. जी. साळुखे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.