सातारा : केंद्रीय सहकार संचालक डी. के. वर्मा यांची अजिंक्यतारा साखर कारखान्याला भेट

सातारा : केंद्र शासनाने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करण्याच्या धोरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सहकारी साखर कारखान्यांना प्राधान्य देण्याचे धोरण ठरविले आहे. तसेच मक्यापासून इथेनॉल निर्मितीसही प्रोत्साहन देण्याचे धोरण आखलेले आहे. देशात सुमारे ३०० लाख टन मक्याचे उत्पादन होते. वर्षातून दोन पिके घेता येतात व कमी पाण्यामध्ये पीक तयार होते. साखर कारखान्यांनी हंगामामध्ये सिरप, बी हेवी व सी हेवीपासून इथेनॉल निर्मिती करावी आणि बिगर हंगामामध्ये मक्यापासून इथेनॉल निर्मिती करावी. त्यामुळे डिस्टिलरी प्लँटचा वापर वाढेल आणि त्यातून साखर कारखान्यांना आर्थिक फायदाही होईल असे मत केंद्रीय सहकार विभागाचे संचालक डी. के. वर्मा यांनी व्यक्त केले.

वर्मा आणि नवी दिल्ली येथील नॅशनल फेडरेशन ऑफ को- ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी अजिंक्यतारा कारखान्याला भेट दिली. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दोघांचे स्वागत केले. माजी अध्यक्ष सर्जेराव सावंत, उपाध्यक्ष नामदेव सावंत आदी उपस्थित होते. यावेळी वर्मा यांनी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने बंद असलेला प्रतापगड सहकारी साखर कारखाना भागीदारी तत्त्वावर चालविण्यास घेऊन तोही यशस्वीपणे सुरू केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असलेला हा सहकारी साखर कारखाना राज्यातील सहकारी साखर कारखानदारीसाठी दिशादर्शक आहे, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here