सातारा : य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी, अधिकारी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. येणाऱ्या गळीत हंगामात आपण निश्चितच चांगले काम करुन कृष्णा कारखानाला देशात प्रथम क्रमांकाचा कारखाना बनवूया, असा विश्वास चेअरमन डॉ. भोसले यांनी व्यक्त केला. कारखान्याच्या सन २०२४- २५ च्या गळीत हंगामासाठी मिल रोलर पूजन उत्साहात झाले. चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते पूजन करुन, यांत्रिक कळ दाबून रोलर बसविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
उपाध्यक्ष जगदीश जगताप यांच्या हस्ते रोलरचे पूजन करण्यात आले. चेअरमन डॉ. भोसले यांच्या हस्ते यांत्रिक कळ दाबून रोलर बसविण्याच्या कामास प्रारंभ झाला. यावेळी संचालक लिंबाजी पाटील, निवासराव थोरात, संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, सयाजी यादव, दत्तात्रय देसाई, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई, दीपक पाटील, कार्यकारी संचालक महावीर घोडके, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, वैभव जाखले, जनरल मॅनेजर टेक्निकल बालाजी पबसेटवार, जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एल. फरांदे आदी उपस्थित होते. कार्यकारी संचालक महावीर घोडके यांनी स्वागत केले. संचालक बाबासो शिंदे यांनी आभार मानले.
सभासदांना घरपोच साखर वितरण
येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने सभासदांना घरपोच साखर वितरण सुरू करण्यात आले आहे. चेअरमन डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांनी प्रत्येक सभासदास ६० किलो मोफत साखर घरपोच देण्याचे अभिवचन दिले होते. त्याची वचनपूर्ती दरवर्षी कारखाना करत आहे. यंदाही या मोफत घरपोच साखर वितरणाचा प्रारंभ केला आहे. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते मोफत घरपोच साखर पोत्यांच्या वाहनांचे पूजन करून या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. इस्लामपूर येथे संचालक संजय पाटील यांच्या हस्ते तर देवराष्ट्रे गावांमध्ये संचालक बाबासो शिंदे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्षेत्रातील कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक, वाळवा तालुक्यातील इस्लामपूर, तर कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे या गावात सभासदांना साखर वाटण्यात आली. उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक लिंबाजी पाटील, संजय पाटील, बाबासो शिंदे, शिवाजी पाटील, अविनाश खरात, दीपक पाटील, कार्यकारी संचालक महावीर घोडके, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, वैभव जाखले, बालाजी पबसेटवार, प्राचार्य डॉ. ए. एल. फरांदे यांची प्रमुख उपस्थित होते.