सातारा : किसन वीर कारखान्याच्या ५३ व्या गळितास प्रारंभ

सातारा : गेल्या दोन वर्षात उसाची कमतरता असूनही कारखाना अडचणीत असताना शेतकऱ्यांच्या उसाला इतर कारखान्यांच्याबरोबरीने दिला आहे. यापुढे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला चांगल्या प्रतिचा ऊस कारखान्याला घालावा, चांगले गाळप झाले, तर सर्व अडचणीतून मार्ग निघून शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर देता येईल, दराबाबत शेतकऱ्यांनी काळजी करू नये, असे आवाहन खासदार नितीन पाटील यांनी केले.

किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचा ५३ वा गळीत हंगामास पाच शेतकऱ्यांच्या हस्ते गव्हाणीचे पूजन करून उसाची मोळी टाकून प्रारंभ झाला. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष व्ही. जी. पवार, संचालक दत्तानाना उमाळ, चंद्रकांत ढमाळ, बाबासाहेब कदम, सचिन साळुंख, खासदार नितीन पाटील, रामदास गाढवे, हिंदुराव तरडे, रामदास इथापे, कार्यकारी संचालक जितेंद्र ननावरे आदी उपस्थित होते.

खासदार पाटील म्हणाले, गेल्या काही काळात हा कारखाना चुकीच्या लोकांच्या हातात गेल्याने संस्था डबघाईस आली होती. आता ती सुस्थितीत आणण्याचे काम करत आहोत. त्यासाठी मंत्रिपद डावलून अजित पवारांबरोबर गेलो आहोत. अजित पवारांनीही कारखान्याच्या मदतीचा शब्द पाळला आहे. कारखान्यावर सत्ता आल्यानंतर काही शिल्लक नसताना सभासदांच्या पैशावर कारखाना चालू केला. दोन हंगाम यशस्वी केले. या हंगामाची सर्व तयारी झाली असून, ऊसतोडी दिल्या आहेत. कारखान्याचे सात लाख टनाचे व खंडाळा कारखान्याचे तीन लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. ते पूर्ण करण्यासाठी शेतकल्पांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here