सातारा : सह्याद्री साखर कारखान्याने मृत सभासदांच्या वारसांना शेअर हस्तांरणास टाळाटाळ केल्याची तक्रार; साखर आयुक्तांना दिले निवेदन

पुणे : सहकार कायद्यातील तरतुदीनुसार मृत सभासदांच्या वारसांना शेअर हस्तांतरण करणे बंधनकारक असताना सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने टाळाटाळ केली आहे. कारखान्याचे चेअरमन तथा माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि त्यांच्या नेतृत्वातील संचालक मंडळाने सहकाराच्या मूळ तत्त्वालाच हरताळ फासल्याचा आरोप कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी केला आहे. साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी याबाबत कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा निवासराव थोरात आणि सभासदांनी दिला आहे.

याबाबत साखर आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोणत्याही सहकारी संस्थेच्या सभासदाचा मृत्यू झाल्यानंतर, त्याचा समभाग वारसाच्या नावे हस्तांतरीत करण्याची तरतूद महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ३० ( १ ) मध्ये आहे; परंतु सह्याद्री साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने याचे उल्लंघन करून कारखान्याच्या मृत सभासदांच्या वारसांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले. सभासदत्वाचा अर्ज अथवा भाग वाटप हस्तांतरण याबाबत नकार देताना, त्यासंबंधीची कारणे अर्जदारास लेखी स्वरूपात कळवणे आवश्यक आहे. मात्र, संचालक मंडळाने राजकीय आकसापोटी अनेक सभासदांच्या मृत्युपश्चात त्यांच्या भागांचे हस्तांतरण त्यांच्या वारसांना केले नाहीत. २,२२१ सभासदांची शेअर्स ट्रान्सफर प्रलंबित असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. निवासराव थोरात, उमेश मोहिते, संग्राम पवार, अमित जाधव, भरत चव्हाण, शैलेश चव्हाण, दादासाहेब चव्हाण, वसंतराव जाधव, सिद्धेश थोरात, दिग्विजय थोरात आदींसह शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे.

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here