सातारा : सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी पी. डी. पाटील पॅनेलला कपबशी चिन्ह देण्यात आले. तर आमदार मनोज घोरपडे, ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या यशवंतराव चव्हाणसाहेब परिवर्तन पॅनेलला छत्री चिन्ह मिळाले. काँग्रेसचे निवास थोरात यांच्या यशवंतराव चव्हाण सह्याद्री परिवर्तन पॅनेलला विमान चिन्ह देण्यात आले. या तीन पॅनेलच्या उमेदवारांसह सात अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, साखर कारखान्याची निवडणूक दुरंगी व्हावी, यासाठी विरोधी गटात एकीचे सुरू असलेले प्रयत्न विफल ठरले.
निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या पी. डी. पाटील पॅनेलच्या उमेदवारांना कपबशी चिन्ह देण्यात आले. तर तर यशवंतराव चव्हाणसाहेब परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांना छत्री हे चिन्ह मिळाले. यशवंतराव चव्हाण सह्याद्री परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांनी विमान या चिन्हाची मागणी करणारा अर्ज सादर केला. तो मंजूर करून त्यांना हे चिन्ह देण्यात आले. तर अपक्ष उमेदवारांपैकी कोपर्डे हवेली गटात आबासाहेब चव्हाण यांना जीपगाडी, श्रीकांत जाधव यांना सनई, त्याच गटातील सुरेंद्र पवार यांना पगडी, वाठार किरोली गटात मुरलीधर गायकवाड यांना शिट्टी, लक्ष्मण जाधव यांना हॅट, मसूर गटातील उमाजी चव्हाण यांना कढई, त्याच गटातील विश्वासराव माने यांना फावडे, इतर मागास प्रवर्गातील दिलीप कुंभार यांना पणती, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील शंकर पवार यांना ट्रॅक्टर चिन्ह मिळाले.