सातारा : जिल्ह्याचे अर्थकारण ऊस पिकावर अवलंबून आहे. जिल्ह्यामध्ये सुमारे १.०५ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस पिकाची लागवड असून ९ सहकारी व ९ खासगी अशा १८ साखर कारखान्यामार्फत ऊसाचे गाळप होते. जिल्हा बँकेच्या पीक कर्ज वितरणात देखील ऊस पिकाचा ७० टक्के वाटा असल्याने ऊसाच्या एकरी उत्पादनात वाढ करण्याच्या अनुषंगाने बँक सातत्याने प्रयत्नशील आहे.
बँकेचे मार्गदर्शक, जेष्ठ संचालक आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या संकल्पनेतून २०२३-२४ या बँकच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ऊस पिकाचे शाश्वत उत्पादन वाढीसाठी प्रायोगीक तत्वावर जिल्ह्यातील ६००० तरुण शेतकऱ्यांचे प्रति एकरी उत्पादन वाढ करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यामध्ये ऊस उत्पादन वाढ व कार्बन क्रेडिट संदर्भात सामंजस्य करार झाला.
याप्रसंगी महात्मा फुले कृषी विद्यापीठचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने नावलौकिक मिळवला आहे. ऊस उत्पादन वाढ या पध्दतीचा देशातील पहिलाच उपक्रम सातारा जिल्हा बँकेच्या माध्यमातून राबवत असताना आनंद वाटतो, असे नमुद केले. यावेळी विद्यापीठाचे नोडल अधिकारी डॉ. धर्मेंद्र कुमार फाळके, मिटकॉन पुणेचे उपाध्यक्ष डॉ. संदीप जाधव यांनी मार्गदर्शन केले.
बँकेचे अध्यक्ष नितिन पाटील यांनी उपस्थित जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या चेअरमन, कार्यकारी संचालक यांना कार्यक्षेत्रातील शेतक- यांना या ऊस उत्पादन वाढ उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.