सातारा : राज्यात एकीकडे कमी ऊस उत्पादनामुळे अनेक साखर कारखान्यांनी गाळप हंगाम संपवला आहे. तर राज्यात काही ठिकाणी शेतकरी कारखान्याला ऊस कधी जाईल, याच्या प्रतीक्षेत आहेत. सातारा जिल्ह्यातील मसूर परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस तब्बल १८ ते २० महिने उटलूनही अद्याप शेतातच उभा आहे. ऊस तोडणी कामगार व मशिनधारकांकडून मोठ्या प्रमाणावर ‘खुशाली’च्या नावावर रक्कम उकळली जात आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. ऊसतोडणीसाठी कामगारांकडून एकरी पाच ते सहा हजार रुपये मागितले जात असल्याचे शेतकरी सांगतात. याशिवाय, ऊस तोडणीसाठी चिकन व मटणचीही मागणी केली जात आहे. या अतिरिक्त खर्चामुळे शेतकरी आणखी अडचणीत आले आहेत.
ऊस वाहतुकीवेळी ट्रॅक्टर चालक ३०० ते ५०० रुपये वसूल करतो. याशिवायस रस्त्यांवर खड्डयांचे प्रमाण वाढले आहे. या खड्ड्यांमुळे ट्रॅक्टर अडकण्याच्या घटना घडून आणखी नुकसान होत आहे. याबाबत ऊस उत्पादक संदीप बर्गे यांनी सांगितले की, दीड वर्षे ऊस पिकाला सांभाळून साखर कारखान्याला पाठवताना नाकी नऊ होते. गटअधिकारी, चिटबॉय, मुकादम यांच्या हात पाय पडावे लागत आहे. एवढे करूनही त्यांना जेवण, चहापाणी, एंट्री यासाठी पैसे द्यावे लागत आहेत. तुरे फुटलेला ऊस वजन कमी करत असून फड पेटविण्यामुळे वजनात व साखर उताऱ्यात घट होत आहे. त्यामुळे कारखान्यांनी ऊसतोडणी यंत्रे, कामगार अधिक प्रमाणात उपलब्ध करावीत, अतिरिक्त खर्चावर निर्बंध आणावेत, कारखान्यांनी ऊस गाळप लवकर करावे अशी मागणी करण्यात येत आहे.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.