सातारा : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने तीन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर जिल्ह्यात सर्वात मोठ्या दीडशे टन क्षमतेच्या विस्तारवाढ प्रकल्पातील बॉयलरचा अग्निप्रदीपन करून मोठी झेप घेतली आहे. गेल्या ५० वर्षांतील बहुचर्चित टप्पा कारखान्याने पूर्ण केला. पुढील वर्षी नवीन प्रकल्प पूर्ण क्षमतेने काम करेल. कारखाना राजकारणाचा अड्डा होऊ देणार नाही, असे प्रतिपादन चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी केले. यशवंतनगर येथे कारखान्याच्या प्रतिदिनी ७५,०० मे. टनावरून ११ हजार मे. टन विस्तारवाढ प्रकल्पातील नवीन बॉयलरच्या अग्निप्रदीपनप्रसंगी ते बोलत होते.
चेअरमन पाटील म्हणाले की, कारखान्याच्या इतिहासात अनेक महत्वपूर्ण टप्पे पार झाले. सुरुवातीला ३,५५३ हेक्टर नोंद वरून आता २२ हजार हेक्टर ऊस नोंदवर गेला आहे. सह्याद्रीने आणि लिफ्ट इरिगेशन कार्यक्षेत्रात केल्या हणबरवाडी योजनेचे पाणी यामुळे ऊस क्षेत्र वाढले. नोंदीपेक्षा ४२ टक्के हकाचा ऊस बाहेर जातो म्हणून विस्तारवाढीची संकल्पना पुढे आली. हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. पंधरा दिवस त्याची ट्रायल घेत आहोत. पुढच्या वर्षी नवीन प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारीला वाव मिळणार नाही. इथेनॉलचा प्रकल्प सुरू केला असून त्याची ३० कोटी कर्जफेड केली आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, व्हाईस चेअरमन लक्ष्मी गायकवाड, युवा नेते जशराज पाटील, कराड मर्चंट संस्थेचे चेअरमन माणिकराव पाटील, मानसिंगराव जगदाळे, राष्ट्रवादीच्या महिला सरचिटणीस सौ.संगीता साळुंखे, के. बायट कंपनीचे निरंजन चंद्रा, नॅशनल फेडरेशनचे गीते, श्रीराम प्रसाद, माजी उपयुक्त तानाजीराव साळुंखे, राष्ट्रवादी युवकचे प्रशांत यादव उपस्थित होते. आर. जी. तांबे यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश माने यांनी आभार मानले.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.