सातारा : सह्याद्री साखर कारखान्याच्या नवीन विस्तारित प्रकल्पाच्या बॉयलर व चिमणीमध्ये बसविण्यात येणाऱ्या ईएसपी यंत्रणेत धूर साचून राहिल्याने स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने घाबरून पळ काढताना तिघांना दुखापत झाली. शैलेश भारती ( वय ३२, मूळ रा. उत्तर प्रदेश सध्या रा. यशवंतनगर, ता. कऱ्हाड), अमित राम (वय १९, मूळ रा. बिहार. सध्या रा. यशवंतनगर), धरमपाल (वय १९, मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी जखमींची नावे आहेत. या घटनेची नोंद तळबीड पोलिसात झाली आहे. सरव्यवस्थापक प्रदीप यादव यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, ईएसपी प्रणालीची चाचणी सुरू असताना स्फोट झाल्याची माहिती कारखान्याने दिली.
सह्याद्री कारखान्याचे सरव्यवस्थापक यादव यांनी सांगितले की, कारखान्यात १० तारखेपासून थरमॅक्स १५० टनी बॉयलरचे टेस्टिंग व ब्लो ऑफचे काम थरमॅक्स कंपनीचे इंजिनिअर यांच्या मार्गदर्शनाखाली व मेके बॉव्हेट यांच्या लोकांमार्फत चालू आहे. बॉयलर व्यवस्थित चालू आहे. बॉयलरमधून निघणारी धूरमिश्रित राख वेगळी करण्याकरिता ईएसपी नावाची यंत्रणा बॉयलर व चिमणीमध्ये बसवलेली असते, ही यंत्रणा चोकअप झाल्याने सदर यंत्रणेची साइडप्लेट फाटल्याने स्फोट झाला आहे. स्फोटामध्ये कोणी जखमी झालेले नाही. तेथील लोक पळत असताना जखमी झाले आहेत. तीन मजुरांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती कारखाना व्यवस्थापनाने दिली आहे.