सातारा : जिल्ह्यातील निसराळे (ता. सातारा) गावी जवळजवळ शंभर हेक्टर क्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून उसाची लागवड केली जाणार आहे. कृषी विभागाने यासाठी पुढाकार घेतला आहे. या योजनेत १२५ शेतकऱ्यांचा सहभाग असेल. शेतकऱ्यांचा काही हिस्सा आणि जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध केला जाणार आहे. कृषी विभागाच्यावतीने पश्चिम महाराष्ट्रात केला जाणारा हा पहिलाच प्रयोग आहे. यापूर्वी निसराळे गावातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाची सुपर केन नर्सरीचा प्रयोग यशस्वी केला होता, तसेच विविध ऊस पीक स्पर्धाही तेथे घेण्यात आली होती.
निसराळे गावातील १२५ शेतकऱ्यांना यामध्ये सामावून घेतले आहे. त्यांच्या माध्यमातून १२५ हेक्टर क्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस लागवड केली जाणार आहे. त्यासाठीचे नियोजन झाले असून, त्याचा आराखडाही अंतिम झाला आहे. आता एआयच्या माध्यमातून ऊस लागवडीचा प्रयोग होत आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी सांगितले. एआय तंत्राने ऊस लागवडीमुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी ऊस शेती करता येईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न १० ते २० टन वाढेल. शेतकऱ्यांना माती जमीन, खतांची, वातावरणीय बदलांची माहिती मिळेल. सेन्सर लावल्याने ओलावा, तापमान बदलाची माहिती समजू शकेल. तसेच सॅटलाइटद्वारे शेताचे मॉनिटरिंग केले जाईल. तब्बल एक हजार हेक्टरवर प्रयोग होणार असून उत्पादन खर्चात २० टक्के, पाण्यात ३० टक्के बचत होईल असे त्यांनी सांगितले.