सातारा : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने २४ शेतकऱ्यांची वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट (पुणे) येथे होणाऱ्या ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली असून हे शेतकरी प्रशिक्षणासाठी रवाना झाले. प्रती एकरी ऊस उत्पादन खर्च कमी व्हावा, ऊस उत्पादन वाढावे या करिता दरवर्षी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मार्फत शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना सहभागी होण्याची संधी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या संचालक मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार २४ शेतकरी प्रशिक्षण घेणार आहेत.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट संस्थेमार्फत शेतकऱ्यांना माती परीक्षण, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, खोडवा व्यवस्थान, रोग व किड व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जैविक खतांचा वापर आदी विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन, नवीन ऊस जातीची माहिती, बियाणे मळा याचे प्रत्यक्ष प्लॉटवर मार्गदर्शन केले जाणार आहे. या शेतकऱ्यांच्यामार्फत गावा-गावातील इतर शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे. प्रशिक्षणासाठी रवाना होणाऱ्या शेतकऱ्यांना कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव सावंत, संचालक वसंत पवार, भास्कर घोरपडे, बजरंग जाधव, राजेंद्र घोरपडे, अशोक कुराडे, सुनील निकम, नितीन पाटील, मुख्य शेती अधिकारी विलास पाटील, शेती व ऊस विकास विभागातील कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.