सातारा : पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमध्ये आयोजित ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे ४३ शेतकरी रवाना झाले. कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक फरांदे यांच्यासह मान्यवरांनी प्रशिक्षणास रवाना होणाऱ्या शेतकरी सभासदांना शुभेच्छा दिल्या. या पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिरात सांगली, सातारा, मराठवाडा व खानदेशमधील हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत.
कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने कार्यक्षेत्रातील ४३ शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचे प्रति एकरी उत्पादन वाढीसाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. जनरल मॅनेजर केन दादासाहेब शेळके, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, एच. आर. मॅनेजर संदीप भोसले, फायनान्स मॅनेजर राजाराम चन्ने, प्रभारी कार्यालयीन अधीक्षक विलास पाटील, स्टोअर किपर गोविंद मोहिते, संरक्षण अधिकारी संजय नलवडे, सहाय्यक शेती अधिकारी अजय दुपटे, सहाय्यक ऊसविकास अधिकारी शिवाजी बाबर आदी उपस्थित होते. शिबिरात माती परीक्षण, जादा ऊस उत्पादनासाठी खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, खोडवा व्यवस्थापन, ऊती संवर्धित रोपे, बियाणे मळा, रोग व कीड नियंत्रण व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जैविक खतांचा वापर आदी विषयांवर मार्गदर्शन केले जाईल.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.