सातारा : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी कारखानदारांनी मागील वर्षीची शिल्लक रक्कम देण्यासह यंदा गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल ४ हजार रूपये जाहीर करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते शंकरराव गोडसे यांनी केली. गोडसे यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली. मागील वर्षी साखर आयुक्तांपुढील बैठकीत ३१०० रूपये पहिली उचल देण्याचे कारखानदारांनी मान्य केले होते. मात्र नंतरही कारखानदारांनी २८०० ते ३१०० रुपयांच्या आसपासच पैसे दिले. उर्वरीत पैसे तातडीने द्यावेत अशी मागणी त्यांनी केली.
गोडसे म्हणाले की, आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास गावागावात होणाऱ्या कारखानदार व उमेदवारांच्या सभा उधळवून लावल्या जातील. यंदा यंदा वर्षभर साखरेचा दर ४० रूपयाहून अधिक राहिला आहे. कारखानदारांना सुद्धा यामुळे ४ हजार देणे फारसे अवघड नाही. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळेच कारखानदारांनी आचारसंहिता जाहीर यापूर्वीच यंदा गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल जाहीर करावी. यंदा आम्ही रास्ता रोको, ट्रॅक्टरचे नुकसान करणे यासारखी रस्त्यावर उतरून आंदोलने करणार नाही. विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यात बहुतांश उमेदवार कारखान्यांशी निगडीतच आहेत. त्यामुळे संबंधित उमेदवार, कारखान्यांचे चेअरमन, संचालकांना गावात फिरू देणार नाही. प्रचार सभा उधळवून लावण्यासोबत प्रचाराच्या गाड्यांना माघारी पाठविले जाणार असल्याचे शंकरराव गोडसे यांनी सांगितले. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कारखान्याने शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या उसाचे प्रतिटन २८०० रुपये दिले आहेत. याबाबत शंकरराव गोडसे यांनी पालकमंत्र्यांसह कारखानदारांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली.