सातारा : ऊसदराची कोंडी फुटली, कृष्णा, जयवंत शुगर्सकडून प्रती टन ३२०० रुपये पहिली उचल जाहीर

सातारा: जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फुटली आहे. रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने आणि धावरवाडी येथील जयवंत शुगर्सने २०२४-२५ या गाळप हंगामासाठी प्रती टन ३२०० रुपयांची पहिली उचल जाहीर केली. कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष व जयवंत शुगर्सचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी ही घोषणा केली. सर्व ऊस उत्पादक व सभासदांनी पिकविलेला सर्व ऊस गळितास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन कारखाना प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून सातारा जिल्ह्यात कोणता कारखाना उसाला किती दर देणार, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. त्याची कोंडी आता फुटली आहे. शेतकरी संघटनांनी ४००० रुपये दराची मागणी केली आहे. मात्र, या दोन्ही कारखान्यांनी ही पहिली उचल जाहीर केली आहे. कृष्णा कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामाला २५ नोव्हेंबरला प्रारंभ केला. कारखान्याने आजअखेर १७ दिवसांत एक लाख ८७ हजार ८०० मेट्रिक टन गाळप केले आहे. एक लाख ८१ हजार ६० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेण्यात आले आहे. तर जयवंत शुगर्सच्या यंदाच्या गळीत हंगामही २५ नोव्हेंबरला प्रारंभ झाला असून, आजअखेर १७ दिवसांत ९४ हजार २२० मेट्रिक टन गाळप झाले असून, ७७ हजार ६५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेण्यात आले आहे.

साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here