सातारा : यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांच्या पी. डी. पाटील पॅनेलने विरोधकांचा धुव्वा उडवला. २१ विरुद्ध शून्य असे निर्विवाद वर्चस्व कायम राखले. तिरंगी लढत, मोठा राजकीय संघर्ष आणि आरोप- प्रत्यारोपांमुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. रविवारी मतमोजणीत दुसऱ्या फेरीअखेर सुमारे आठ हजारावर मताधिक्याने पॅनेल विजयी झाले. विजयानंतर पॅनेलच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. कारखान्यासाठी चुरशीने ८१.७ टक्के मतदान झाले होते. मतदानाची टक्केवारी वाढल्याने सत्तांतर होईल, असा विरोधकांना कयास मात्र या निकालाने मोडीत निघाला.
निवडणूक करखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचे पी. डी. पाटील पॅनेल, आमदार मनोज घोरपडे आणि ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनल आणि काँग्रेसचे निवास थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष धर्यशील कदम, कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ यांचे शेतकरी परिवर्तन पॅनलमध्ये तिरंगी लढत झाली. नऊ अपक्षांनीही मतदारांचा कौल अजिमावला. पाच तालुक्यांतील ६८ गावांतील ९९ मतदान केद्रांवर २६ हजार ८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आठच्या सुमारास मतमोजणी सुरू झाली.
विरोधी पॅनेलकडून पाटील यांच्या कारखान्यातील कारभारावर प्रचार सभांतून आरोप करण्यात आले. कारखान्यावरील कर्ज, विस्तारवाढीला झालेला विलंब, त्याचा खर्च, धनगरवाडी- हणबरवाडी योजनेचे पाणी आदीवर जोरदार हल्लाबोल झाला. मात्र पाटील यांनी त्याला संयमाने उत्तर देत मतदारांना वस्तुस्थिती मांगून पी. डी. पाटील पॅनेलच्या बाजूने कायम ठेवण्यात यश मिळविल्याचे मतमोजणीच्या अंतिम निकालातून दिसून आले. निकालानंतर कारखान्याचे अध्यक्ष, माजी मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले कि, ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराला मतदान झाले. कारखान्याच्या हजारो सभासद शेतकऱ्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला. समोरून पातळी सोडून आरोप होत होते. मात्र, (कै) यथावंतराव चव्हाण यांचे संस्कार आमच्यावर आहेत आणि त्यामुळेच संयम राखल्याने त्याचे फलित विजयश्रीतून मिळाले आहे, असेही ते म्हणाले.
विजय सभासदांना समर्पित : बाळासाहेब पाटील
यापुढच्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिकांच्या निवडणुकाही याच उत्साह अन् जोमाने लढायच्या आणि तेथे जिंकायच्या आहेत, त्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. कारखान्यावर कोणतेही कर्ज नसताना दिशाभूल करून सभासदांमध्ये संभ्रमावस्था पसरविणारी प्रवृत्तीही या निमित्ताने सभासदांनी कारखान्याबाहेर ठेवली, त्यामुळे आजचा विजय त्याच सभासदांसाठी समर्पित करतो, अशी भावनिक सादही त्यांनी घातली. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निकालानंतर माजी मंत्री पाटील यांच्या समर्थकांनी शहरातून शहरातून विजयी मिरवणूक काढलो. त्या वेळी त्यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण समाधिस्थळी अभिवादनही केले
सभासदांनी दिलेला कौल मान्य : आमदार मनोज घोरपडे
वैयक्तिक स्वार्थासाठी मी ही निवडणूक लढवली नव्हती. शेतकरी, सभासदांना न्याय मिळावा, सभासद मालक म्हणून कारखान्यात राहावा, या प्रामाणिक भावनेतून (कै.) यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे गेलो होतो. तरीही पराभवाने खचून न जाता सभासदांच्या न्याय हक्कासाठी भविष्यातही लढत राहणार आहे. या निवडणुकीत आमच्या सोबत राहणाऱ्या सभासदांना धन्यवाद देतो.
घोरपडे-उंडाळकर यांचे पॅनेल दुसऱ्या स्थानी
पहिल्या फेरीत विरोधी पॅनलमध्ये आमदार घोरपडे, ॲड. उंडाळकर यांच्या पॅनेलला दुसऱ्या क्रमांकाची, तर भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ व काँग्रेसचे निवास थोरात यांच्या पॅनलला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाल्याचे दुसऱ्या फेरीतील निकालाच्या शेवटी दिसून आले.