सातारा : कराड येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये कोतोली- पाटीलवाडी (ता. शाहुवाडी) येथील प्रगतशील शेतकरी अरुणकुमार दौलू पाटील यांच्या गुळाला उच्चांकी ६८०० रुपयांचा दर मिळाला. तर पार्ले (ता. कराड) येथील शेतकरी निखिल मारुती नलावडे यांच्या गुळाला सहा हजार चारशे रुपये उच्चांकी दर मिळाला. शनिवारी झालेल्या यंदाच्या सौद्यात यंदाच्या हंगामातील उच्चांकी दर शेतकऱ्यांना मिळाला आहे.
बाजार समितीतील शिवतेज ट्रेडिंग या अडत दुकानात सौदे झाले त्यात खरेदीदार व्यापारी ए. एफ. ट्रेडर्स व डी. के. ब्रदर्स यांनी तो गुळ खरेदी केला. या चौथ्यात एकूण ४४८ क्विंटल गुळाची विक्री झाली. यावेळी उच्चांकी दर मिळालेल्या अरुण पाटील, निखिल नलवडे या शेतकऱ्यांचा बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम यांच्या हस्ते व संचालक जयंतीलाल पटेल, उत्तमराव जाधव, प्र. सचिव आबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत सत्कार झाला. बाजार समितीत गुळाची आवक वाढली आहे. गुळाला ४१०० रुपये सरासरी दर मिळत आहे.