सातारा : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आगामी काही दिवसांत सुरू होणार असून साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाच्या दराबाबत योग्य भूमिका घ्यावी, अशी मागणी सर्व शेतकरी संघटनांची आहे. याबाबत कराड उत्तर शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन दिले होते. त्यांनी या निवेदनाची सत्वर दखल घेतली असून सोमवारी सर्व साखर कारखान्याचे चेअरमन, कार्यकारी संचालक आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक बोलावली आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम दसऱ्यानंतर सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकरी संघटनांनी ऊस दराच्या आंदोलनाबाबत भूमिका घेतली आहे. यातून चर्चेद्वारे मार्ग काढून गळीत हंगाम यशस्वी व्हावे यासाठी जिल्हाधिकारी डुडी प्रयत्नशील आहेत. त्यांनी दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक बोलावली आहे. रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेचे कराड उत्तर तालुकाध्यक्ष वसीम इनामदार यांनी ही माहिती दिली. कारखानदारांसह कराड उत्तर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वसीम इनामदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव आदी या बैठकीस उपस्थित राहाणार आहेत.