सातारा : लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्यात भीषण आग, ३५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज

सातारा : पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यास शनिवारी (दि. २२) रात्री ९.३० च्या सुमारास आग लागली. या आगीत कारखान्याची रेकॉर्ड रूम आणि शेती ऑफिस पूर्णपणे जळून खाक झाले. या आगीत ३५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतची फिर्याद मल्हारपेठ पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मल्हारपेठचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले आणि महिला पोलीस उपनिरीक्षक एस. बी. शेळके पोलीस फौजफाट्यासह रविवारी दिवसभर आगीच्या कारणाचा शोध घेत होते. याबाबत मल्हारपेठ पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार माने यांनी पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरून माहिती दिली. देसाई साखर कारखान्याच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

या आगीत जीवितहानी झाली नसली, तरी कारखान्याची महत्त्वाची कागदपत्रे असलेली रेकॉर्ड रूम आणि शेती ऑफिस पूर्णपणे जळून खाक झाले आहे. कारखान्याचा गळीत हंगाम नुकताच संपला आहे. आग लागल्याचे रात्री कामावर असलेल्या सुरक्षारक्षकांना समजताच, त्यांनी तिकडे धाव घेतली. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यांनी तातडीने हालचाल करून, कराड नगरपरिषद, सह्याद्री कारखाना, जयवंत शुगर आणि सातारा येथील अजिंक्यतारा कारखान्याच्या अग्निशमन दलास पाचारण केले. देसाई कारखान्याच्या अग्निशामक बंबासह चार ते पाच अग्निशामक बंबांच्या साह्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here