सातारा : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुमारे २५ वर्षांनंतर होत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटाला शह देण्यासाठी विरोधी काँग्रेस, भाजपसह सर्वपक्षीय नेत्यांनी मोट बांधली. मात्र, जागा वाटपाची चर्चा फिस्कटल्याने विरोधी गटाच्या नेत्यांत फूट पडली. त्यामुळे बाजार समिती पॅटर्न वापरून एकत्रितपणे निवडणूक लढविण्याचे नेत्यांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. भाजप- काँग्रेसमध्ये पडलेली फूट दोन्ही पक्ष्यांसाठी धोक्याचीच मानली जात आहे.
विधानसभा निवडणुकीत आमदार मनोज घोरपडे यांनी माजी सहकारमंत्री पाटील यांचा पराभव केला. त्यानंतर आमदार घोरपडे यांनी सह्याद्री कारखान्याची निवडणूक लढविण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे सर्वपक्षीय नेते एकत्र झाले. मात्र, आता भाजपचे आमदार घोरपडे, काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांचा गट आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, भीमराव पाटील यांच्या समर्थकांचा दुसरा गट तयार झाला आहे. त्यामुळे नेत्यांत फाटाफूट होऊन ते नेते दुरावल्याचे पाहायला मिळाले. अर्ज माघारीच्या दिवशी विरोधी गटात मेळ बसला नसल्याचे दिसले. जागा वाटपावरून काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांत फूट पडली. दोन्ही पक्षातील नेत्यांत तू की मी मोठा या कारणावरून आणि जागा कोणाच्या जास्त यातूनफूट पडल्याचे बोलले जात आहे. आमदार घोरपडे यांच्या विरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ यांनी उघड भूमिका घेतली आहे.