सातारा : बदलत्या हवामान परिस्थितीत पर्यावरणपुरक खोडवा ऊसाच्या शाश्वत व विक्रमी उत्पादन या विषयावर शेतकऱ्यांसाठी किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ऊस पिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार (दि. १०) सकाळी ही कार्यशाळा होणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली. कार्यशाळेत पुणे येथील कृषि महाविद्यालयाचे माती व पाणी चिकित्सालयचे व्यवस्थापक डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके, सातारा जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, पाडेगांव येथील ऊस संशोधन केंद्र विभागातील ऊस रोग शास्त्रज्ञ डॉ. सुरज नलवडे, पुणे येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषि अर्थशास्त्रच्या प्राध्यापिका डॉ. ताई देवकाते उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत असे त्यांनी सांगितले.
किसन वीर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंद पाटील ऊस पिक कार्यशाळेच्या अध्यक्षस्थान भूषविणार असून सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन व कारखान्याचे संचालक नितीन काका पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, बदलणाऱ्या हवामानाचा परिणाम विशेषतः शेतीवर होतो. शेतकऱ्यांनीही त्यानुसार आपल्या शेतामध्ये बदल करणे गरजेचे आहे. याकरिताच किसन वीर कारखाना, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि पुणे येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठ व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या ऊस पिक कार्यशाळेचे आयोजन केले आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, खंडाळा कारखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, उपाध्यक्ष राजेंद्र तांबे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी केले आहे.