सातारा : अनंत अडचणीतून व संघर्षातून मार्ग काढत आज पडळ कारखाना सभासद व पदाधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमातून पूर्णावस्थेत पोहोचला आहे. शेतकऱ्यांचा राहिलेला १५० रुपयांचा हप्ता सभासदांच्या खात्यात जमा करून सभासद शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यात येईल, असे आश्वासन खटाव माण तालुका अॅग्रो प्रो.लि. (पडळ ता. खटाव) कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी केले.
पडळ कारखान्याचा २०२४-२५ चा सहावा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ कारखाना स्थळावर आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी घार्गे बोलत होते. याप्रसंगी प्रभाकर देशमुख, रणजितसिंह देशमुख, अभयसिंह जगताप, मनोज पोळ, संजय साळुंखे, श्रीमंत पाटील, रघुनाथ घाडगे, सुभाष नरळे, वडूजचे माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, प्रा. सदाशिव खाडे, एम. के. भोसले, विनोद देशमुख, राजू मुलाणी, तानाजी मगर, बाबासाहेब पवार, संचालिका सौ. प्रीती घार्गे- पाटील, राहुल पाटील, महेश घार्गे, जनरल मॅनेजर काकासो महाडिक, कारखान्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
घार्गे पुढे म्हणाले, यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने यंदा उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होणार आहे. गेल्या सहा वर्षाच्या आपल्या कालावधीत कारखान्याने विविध नवनवीन प्रकल्प राबवून असून शेतकऱ्यांबरोबरच या भागातील सर्व रस्त्यांची जबाबदारी कारखान्याने घेऊन या भागाचा विकास करण्याची भूमिका घेतली आहे. याप्रसंगी प्रभाकर देशमुख, अभय सिंह जगताप, रणजितसिंह देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. आभार संचालिका सौ. प्रिती घार्गे-पाटील यांनी मानले.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.