सातारा : सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिणच्या डोंगरी भागात शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावर्षी डोंगरी भागात कमी पाऊस झाला. अवकाळी पाऊसही कमी झाल्याने विभागातील लहान-मोठी धरणे, पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. त्यामुळे अनेक गावात पाणी टंचाई आहे. धरणातील पाणीसाठा कमी असल्याने आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध न झाल्याने विभागात उसाच्या पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. काही गावात पुरेसे पाणी नसल्याने ऊस शेती वाळून चालली आहे. आणि सध्या उपलब्ध क्षेत्रावर क्षेत्राला पाणी नसल्याने ऊस शेती वाळून चालली आहे.
कराड दक्षिण विभागातील येवती येळगाव, येणपे, चोरमारेवाडी, लोहारवाडी, शेवाळेवाडी, गोटेवाडी, जिंती, आकाईवाडी यासह परिसरातील लहान-मोठी धरणे, पाझर तलाव ५० टक्केच्या आतच राहिली. येवती धरणाची क्षमता मोठी असून पाऊन टीएमसी क्षमतेचे हे धरण यावर्षी ४० ते ४५ टक्केच भरले. धरणातील पाणी काही अंशी नदीपात्रात व काही अंशी पाणी कॅनॉलमध्ये सोडले त्यामुळे विभागातील शेती कशीबशी वाचली. मात्र, आता परिस्थितीत खूप बिकट झाली आहे. मोठ्या धरणाचा पाणीसाठा पन्नास टक्केपर्यंतच राहिला. अनेक धरणांतील पाणीसाठा शेतीसाठी मोठ्या प्रमाणात वापरला जात असल्याने पुढील काळात टंचाई भासण्याची शक्यता आहे.