सातारा : सह्याद्री कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील १८ गावांमध्ये कारखान्याने इरिगेशन संस्था उभारल्या आहेत. परिसरातील लोकांचे जीवनमान उंचावण्याचे काम केले आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील ही गावे सोडण्यास सहमती न देण्याचा ठराव कारखान्याचे चेअरमन माजी सहकार मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांनी ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडला. सभासदांनी आवाजी मतदानाने या ठरावाला मंजुरी दिली. यशवंतनगर (ता. कराड) येथे साखर कारखान्याची ही ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. ऐनवेळच्या विषयामध्ये युवा नेते जशराज पाटील यांनी हा ठराव मांडला. यावेळी माजी आ. मोहनराव कदम, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील माने, तालुकाध्यक्ष देवराज पाटील, सरचिटणीस संभाजीराव गायकवाड, जिल्हा बँकेचे संचालक लहूराज जाधव, कारखान्याच्या उपाध्यक्षा लक्ष्मीताई गायकवाड, प्रशांत यादव आदी उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले की, सहकारी साखर कारखान्यांनी रस्ते करायचे आणि ऊस मात्र खासगीकडे घालायचा ही गंभीर बाब आहे. कारखान्याकडे ऊस येण्याची काळजी सर्वांनी घ्यावी. राज्य सरकारने सप्टेबर निम्मा झाला तरी मंत्री समितीची बैठक घेतलेली नाही, त्यामुळे साखर उद्योगाचे धोरण ठरले नसल्याने अडचण होणार आहे. यावेळी उत्तम पिसाळ, भरत चव्हाण, दादासो साळुंखे, भीमराव इंगवले, सतीश चव्हाण, अनिल घोरपडे, आनंदराव थोरात, जयसिंग गावडे आदी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. साखर निर्यातीच्या पुरस्काराने सलग चौथ्यांदा सन्मानित झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी नोटीस वाचन केले. चिफ अकाऊंटंट जे. एस. नाईक यांनी अहवाल वाचन केले. मानसिंगराव जगदाळे यांनी आभार मानले. संचालक माणिकराव पाटील, संजय थोरात, लालासाहेब पाटील, पांडुरंग चव्हाण, कांतीलाल पाटील, अविनाश माने, आदीसह सर्व संचालक सभासद ऊस उत्पादक उपस्थित होते.