सातारा : सह्याद्री कारखान्याचे विस्तारीकरण चार वर्षांपासून सुरू आहे. केवळ आर्थिक लाभासाठी संबंधित ठेकेदाराला काम दिले आहे. विस्तारीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. ४०० कोटींहून अधिक खर्चाच्या या कामात आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. सहकार विभागामार्फत कारखाना विस्तारीकरणाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी करू अशी माहिती आमदार मनोज घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेला रणजित पाटील, राहुल पाटील पार्लेकर, कृष्णत शेडगे, अमोल पवार, महेश चव्हाण आदी उपस्थित होते.
आमदार घोरपडे म्हणाले की, केवळ आर्थिक लाभासाठी चार वर्षांपासून संबंधित विस्तारीकरण सुरू आहे. त्यासाठी चारशे कोटींहून अधिकचा खर्च केला आहे. हेच काम कृष्णा सहकारी साखर कारखान्यात अडीचशे कोटींत झाले आहे. तेही दोन-अडीच वर्षांत. मग सह्याद्रीच्या विस्तारीकरणासाठी एवढी वर्षे का लागली? याचे उत्तर मिळायला हवे. सह्याद्री कारखान्यावर पाचशे कोटींहून अधिकचे कर्ज आहे. कारखान्याचा कारभार दहा वर्षांत बेजबाबदार पद्धतीने व एकाधिकारशाही केला गेला आहे. दरम्यान, सह्याद्री कारखान्यात बॉयलरच्या ईएसपीचा स्फोट झाला. यात पाच कामगार जखमी झाले. त्यांच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विद्यमान अध्यक्षांनी कामगारांची भेट घेऊन विचारपूसही केलेली नाही असा आरोप त्यांनी केला.