सातारा : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या वजन काट्याची तपासणी प्रांताधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या शासन प्रतिनिधी, शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी अचानक केली आहे. त्यात वजन काटे अगदी बिनचूक असल्याचे आढळले आहे. काहीजण सुडबुद्धीने अपप्रचार करीत आहेत, असे कारखान्याचे अध्यक्ष, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी म्हटले आहे. याबाबत कारखान्याकडे उपलब्ध असणाऱ्या अॅटोमेटिक वेइंग मशिनवर साखर भरणा केला जातो. त्यामुळे त्याच्यामध्ये त्रुटी येण्याचा प्रश्नच येत नाही. शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या उसाचे वजन अचूक असल्याचे अहवाल संबंधित पथकाने दिलेला आहे असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
अध्यक्ष पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे की, यशवंतनगर येथे कारखान्याच्या वजन काट्याची तपासणी पथकाने केली. त्यात चार वजन काटे अगदी बिनचूक असल्याचा निर्वाळा संबंधित पथकाने दिला आहे. कारखान्याकडून कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार, गैरकारभार कधीही झालेला नाही. कारखान्याची प्रतिमा मलिन करणे व आपला राजकीय हेतू सूडबुद्धीने साध्य करण्यासाठी चुकीचा प्रसार केला जात आहे. शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नयेत.