सातारा : किसन वीर कारखान्याने थकीत बिले देण्याची शिवसेनेची मागणी

सातारा : भुईंज येथील किसन वीर साखर कारखान्याने १५ डिसेंबरनंतर गाळप झालेल्या उसाची बिले दिलेली नाहीत. कारखान्याने तातडीने ऊस बिले द्यावीत अशी मागणी शिवसेनेच्या सातारा-जावळी विधानसभा प्रमुख प्रशांत तरडे यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावर सध्या कर्जाचा डोंगर असून, ऊसबिले वेळेत जमा न झाल्यास त्यांनी आपली कर्जे कशी फेडायची? त्यामुळेच कारखान्याने तातडीने हालचाल करून मार्चअखेर बिले जमा करावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

याबाबत प्रशांत तरडे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ५० हजारहून अधिक सभासद असलेल्या भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याने १५ डिसेंबरनंतर एकही ऊसबिल काढलेले नाही. नियमानुसार, उसाचे बिल १४ दिवसांत एफआरपी कायद्यानुसार संबंधित शेतकऱ्यांना अदा करणे गरजेचे आहे. कारखान्याचे अध्यक्ष मकरंद पाटील हे सध्या राज्याच्या मंत्रिमंडळात मदत व पुनर्वसनमंत्री, तर त्यांचे बंधू नितीन पाटील कारखान्याचे संचालक व जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. हे दोघे एवढ्या मोठ्या पदावर काम करत असताना शेतकऱ्यांची देणी थकीत राहात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कारखान्याच्या निवडणुकीत संचालक मंडळातील सदस्यांनी सभासद शेतकऱ्यांना वारेमाप आश्वासन दिली होती. त्यापूर्वी कारखाना अडचणीत असताना तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून या कारखान्यास सुमारे ५०० कोटींचे थकहमी दिली होती, तरीही शेतकऱ्यांची ऊसबिले न दिल्याने शेतकरीवर्गात संभ्रम निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here