सातारा : श्रीराम कारखान्यावर प्रशासक नियुक्तीनंतर विरोधकांकडून झालेल्या आरोप- प्रत्यारोपाला उत्तर देताना आयोजित पत्रकार परिषदेत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी, स्पर्धात्मक दर आणि उत्तम प्रकारे ‘श्रीराम’चे कामकाज सुरू आहे. कुठल्याही अडचणी नसून सर्व नियमांना धरून त्याठिकाणी कामकाज चालत आहे, अशी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर हवा आहे आणि तो वेळेत मिळायला पाहिजे. गेल्या दोन वर्षांत एफआरपीपेक्षा अधिक दर श्रीराम जवाहरने दिला आहे. चालू वर्षी २८८१ एफआरपी होती; आम्ही ३१०० रुपये दर देऊन १०० टक्के देणी अदा केली आहेत, असे ते म्हणाले.
संजीवराजे नाईक- निंबाळकर म्हणाले की, कारखाना अवसायनात काढण्याची परिस्थिती असल्याचे व कारखान्याला जवळपास १०० कोटींची देणी असल्याचे विरोधकांकडून सांगण्यात आले. तशी वस्तूस्थिती नाही. तसे असते तर कारखान्याला ऊसाला दर सुद्धा देता आला नसता. कामगारांचे पगार वेळेवर होत आहेत. चालू वर्षी ५ हजार टन ऊस गाळप करून दाखवला आहे. पुढील एक- दोन वर्षांत १० हजार टन कारखान्याची गाळप क्षमता होईल. ९० हजार लिटरची डिस्लरी सुरू होईल. श्रीराम जवाहर एकत्रित काम करत असल्यावरून आरोप झाले आहेत. त्या सर्व आरोपांना कुठलाही आधार नाही. या वेळी अनिकेतराजे नाईक निंबाळकर, माजी अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे, माजी उपाध्यक्ष नितीन भोसले आदी उपस्थित होते.