सातारा : सह्याद्री साखर कारखान्याच्या ‘हाय व्होल्टेज’ तिरंगी लढतीकडे राज्याचे लक्ष

सातारा : कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीसाठी माजी सहकार मंत्री व कारखान्याचे विद्यमान चेअरमन, माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासमोर ‘कराड उत्तर’चे आमदार मनोज घोरपडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास थोरात यांचे तगडे आव्हान आहे. शेवटच्या क्षणी जागावाटपाचा तिढा न सुटल्याने तिरंगी लढत होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. या लढतीत निवासराव थोरात यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ यांची साथ लाभणार आहे. बत्तीस हजार सभासद आणि पाच तालुक्यांत कार्यक्षेत्र असलेल्या सह्याद्री सहकारी कारखान्याच्या निर्मितीपासूनच यशवंतराव चव्हाण यांचे विश्वासू सहकारी के. पी. डी. पाटील यांनी कारखान्याचा कार्यभार सांभाळला. मागील पंचवीस वर्षांपासून माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी चेअरमनपदाची धुरा एकहाती सांभाळली आहे.

भाजपमधील फुटीचा फायदा बाळासाहेबांना होणार ?

भारतीय जनता पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, भीमराव पाटील यांनी मनोज घोरपडे यांच्याविरोधात भूमिका घेतल्याचा फायदा बाळासाहेब पाटील गटाला होणार का, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांनी सह्याद्रीच्या रणांगणात दंड थोपटून सर्वसामान्य सभासदाला सह्याद्री’चा अध्यक्ष करुन सतेचे विकेंद्रीकरण करणार असल्याची घोषणा केली आहे. बाळासाहेब विरोधी गटांना एकत्रितपणे घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी मसूरच्या मेळाव्यात स्पष्ट केले.

सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकच करताहेत एकमेकांना टार्गेट…

कारखान्यातील सत्ताधारी माजी मंत्री बाळासाहेब पाटील गटाला शह देण्यासाठी विरोधी काँग्रेस, भाजपसह सर्व पक्षीय नेते गेल्या सहा महिन्यांपासून एकवटले होते. मात्र, शेवटच्या टप्यात या नेत्यांत फूट पडल्याचे चिन्ह वाटपादरम्यान दिसून आले. कारखान्यात सत्ता मिळविण्याचा चंग बांधलेल्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना टार्गेट करण्यापेक्षा एकमेकांनाच टार्गेट केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सह्याद्रीची निवडणूक एकसंधपणे लढण्याची विरोधकांनी गेल्या सहा महिन्यांपासून केलेल्या तयारीवरच पाणी फेरल्याचे दिसून आले. यावेळी कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

‘त्यांना’ निवडणूक लढण्याचा नैतिक अधिकार आहे का ? : बाळासाहेब पाटील

काही खासगी कारखानदार स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी सहकारात आदर्शवत ठरलेल्या सह्याद्री कारखान्याची निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत, त्यांना तो नैतिक अधिकार आहे का? याचा सह्याद्री साखर कारखान्याच्या सभासदांनी विचार करावा, असे प्रतिपादन राज्याचे माजी सहकार मंत्री, सह्याद्री कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी केले. सह्याद्रि सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारार्थ हिंगणगाव (ता. कडेगाव) येथे सभासद संवाद बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी सभासदांनी कारखान्याविषयी असलेली आपुलकी आणि दृढ विश्वास व्यक्त केला. यशवंतराव चव्हाण यांनी उभारलेली सहकार चळवळ टिकून राहण्यासाठी आपण सर्वांनी पी. डी पाटील पॅनेलच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन बाळासाहेब पाटील यांनी केले.

आमदारकी वापरून अर्ज बाद करण्याचे षडयंत्र : धैर्यशील कदम यांचा आरोप

सह्याद्री सहकारी साखर कारखाना ५४ वर्षे एकाच कुटुंबाकडे आहे. त्यामुळे तेथे सत्तांतरासाठी आम्ही विरोधी गटाचे सर्वजण एकत्र येऊन लढण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र, आमच्यातीलच काही जणांनी आमचा विश्वासघात केला. आमच्या पॅनेलला चिन्ह मिळू नये म्हणून प्रयत्न केले. त्यामुळे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या सह्याद्री कारखान्याची दुकानदारी ही मत्यापूरमधून चालून देणार नाही, असा निर्धार केला आहे. आमचे यशवंतराव चव्हाण सह्याद्री शेतकरी परिवर्तन पॅनेल हे विमान चिन्हाद्वारे निवडणुकीला सामोरे जात आहोत. ही निवडणूक नक्कीच जिंकू, असा विश्वास पॅनेलचे प्रमुख निवास थोरात यांनी व्यक्त केला. आमदारांनी आमदारकीची ताकद वापरून निवास थोरात यांचा अर्ज बाद करण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी आमदार मनोज घोरपडे यांच्यावर नाव न घेता केला. सह्याद्री कारखान्याच्या सहकारी साखर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूमिका मांडण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपचे कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here