सातारा : सह्याद्री साखर कारखान्याने गेल्या ५० वर्षात शेतकरी सभासदांसाठी शिक्षण व इतर सोयी सुविधा दिल्या. आता ५१ वा गळीत हंगाम सुरू झाल्यावर सभासदांना काहीतरी दिले पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संचालक मंडळाने सुवर्ण महोत्सवी वर्षात, १ एप्रिल २०२५ पासून सभासदांचे शेअर्स ज्या प्रमाणात आहेत, त्या सभासदांना त्यांची साखर गावात मोफत पोहोच केली जाईल, अशी घोषणा कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी केली. सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात तीन लाख पाचव्या साखर पोत्याचे पूजन प्रसंगी बोलत होते. सध्या आपला कारखाना आठ हजार प्लसने चालला आहे. नवीन सुरू झाल्यावर अकरा हजार मेट्रिक टनाने गळीत होईल असे त्यांनी सांगितले.
चेअरमन पाटील म्हणाले की, कारखान्यात गळीतास येणाऱ्या ऊसाला चालू हंगामात पहिला हप्ता ३२०४ रुपये दर जाहीर करून आम्ही ऊस दराची कोंडी फोडली आहे. उच्चकी दराची परंपरा कायम करत नंतर आणखी काही रक्कमेचा दुसरा हप्ता देणार आहे. कारखाना विस्ताराचे काम पर्ण होईल आणि ११००० मेट्रिक टन गळीत होईल. पुढच्या गळीत हंगामात दोन कारखाने, दोन डीस्टलरी चांगल्या पद्धतीने चालू राहतील. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने,कराड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील, महाराष्ट्र राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष शहाजी क्षीरसागर, माजी सभापती प्रणव ताटे, माजी सनदी अधिकारी तानाजीराव साळुंखे, कारखान्याचे उपाध्यक्षा लक्ष्मी गायकवाड, संचालक जशराज पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारणी सदस्या संगीता साळुंखे, पी. डी. पाटील बँकेचे संचालक सागर पाटील तसेच कारखान्याचे सर्व संचालक यांची प्रमुख उपस्थिती होती. संचालक मानसिंगराव जगदाळे यांनी आभार मानले.