सातारा : किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर सातारा सहकारी शेती औद्योगिक तोडणी व वाहतूक सोसायटीमार्फत ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदारांनी आपले करार केले. प्राथमिक स्वरूपात अविनाश सावंत, आदिक ढाणे, पंडित शिंदे, सुभाष खेडेकर, नितीन जायकर यांच्यासोबत कारखान्याने हे करार केले. यावेळी ‘किसन वीर’च्या प्रगतीसाठी गळीत हंगाम २०२५-२६ मध्येही साथ द्यावी, असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी केले. सन २०२५ – २६ च्या गळीत हंगामातही इतर कारखान्यांप्रमाणे तोडणी वाहतूक कंत्राटदारांना उचल देणार आहोत. त्यांना येणाऱ्या अडचणींचाही निपटारा केले जाणार असल्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले.
उपाध्यक्ष शिंदे यांनी सांगितले की, किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष तथा राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली किसनवीर साखर कारखान्याची विस्कटलेली घडी बसविण्यात मागील तीन वर्षामध्ये यशस्वी झालो आहोत. शेतकऱ्यांना इतर कारखान्यांच्याप्रमाणे दर देण्याचा प्रयत्न केला, त्याचपद्धतीने तोडणी वाहतूक कंत्राटदार, मशिन मालक, बैलगाडी कंत्राटदार यांनाही दर देण्यात कमी पडलो नाही. यावेळी संचालक हिंदराव तरडे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, जितेंद्र रणवरे, खंडाळा कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र तांबे, संचालक चंद्रकांत ढमाळ, बाळासाहेब वीर, तोडणी वाहतूक संस्थेचे अध्यक्ष बबनराव साबळे, उपाध्यक्ष अजय कदम, मानसिंग साबळे, चंद्रकांत फडतरे, शशिकांत भोईटे आदी उपस्थित होते.