सातारा : धरणे पूर्णपणे न भरल्याने कालव्याला वेळेत पाणी येईना. विहिरीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आडसाली, १८ महिने जपलेला ऊस वाळू लागला आहे. कारखान्यांकडे वारंवार विनंती करूनही वेळेत ऊस तोडण्यासाठी मजुरांची टोळी मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. पाण्याची पातळी पूर्णपणे खालावली आहे. त्यामुळे उसासह इतर पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. काही शेतकऱ्यांनी तर यावर्षी उसाची लागण करणे टाळल्याचे दिसून येत आहे.
ज्या शेतकऱ्यांनी जून २०२२ मध्ये आडसाली लागणी केली आहे, त्या उसाला आज १८ ते २० महिने पूर्ण होत आले आहेत. पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांचे उसाचे पीक शेतातच वाळू लागले आहे. मात्र कारखान्याकडून ऊस तोडणीसाठी टोळी मिळेना झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आडसाली ऊस तुटून गेल्यानंतर उसाच्या खोडवा न राखता रब्बी हंगामातील गहू, हरभरा, शाळू आधी पिके घेतली आहेत. दरम्यान, ऊस तोडणीसाठी कारखान्याकडून नियमित दरानुसार पैसे मिळत असले, तरी अनेक ऊसतोडणी करणाऱ्या टोळ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून ऊसतोडणीसाठी पैसे मागत असतात. आता ऊस तोडणी करणाऱ्या टोळ्या एकरी तीन ते पाच हजार रुपये घेताना दिसून येत आहेत.