सातारा : सह्याद्री साखर कारखान्याच्या सभासदांना योग्य तो न्याय मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना ही निवडणूक लढवणार आहे. प्रसंगी विरोधकांसोबत जाऊ अथवा दोन्ही बाजूकडील नाराजांना एकत्र करून स्वाभिमानीचे स्वतंत्र पॅनेल उभे करून कारखान्याची निवडणूक लढवू. सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहोत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाध्यक्ष राजू शेळके, जिल्हा स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे उपाध्यक्ष दादासाहेब यादव, उत्तम साळुंखे, तालुकाध्यक्ष बापूसाहेब साळुंखे, रामचंद्र साळुंखे, उमेदवार मुरलीधर गायकवाड, थोरात आदी उपस्थित होते.
देवानंद पाटील आणि जिल्हाध्यक्ष शेळके यांनी सांगितले की, राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्रीची निवडणूक लढणार आहे. आमदार मनोज घोरपडे यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे. निवडणुकीत आमच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. परिवर्तनाच्या बाजूने आम्ही जाणार आहोत. तेथे योग्य सन्मान न मिळाल्यासही निवडणूक स्वतंत्र लढू. आता सभासदांनीच निवडणूक हातात घेतल्याने कृष्णा कारखान्याने सभासदांना मोफत साखर देण्याच्या घेतलेल्या निर्णयावर टीका करणारे आता सभासदांना मोफत साखर देण्याची घोषणा करत आहेत. सह्याद्रीचे नेते शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा ऊस मुद्दामहून कारखान्याला नेत नाहीत. त्यामुळे कारखान्यात आता परिवर्तन झाले पाहिजे.
महत्त्वाच्या बातम्या:
महाराष्ट्र : राज्यातील आणखी नऊ साखर कारखान्यांना सरकारकडून 1100 कोटींची थकहमी
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.