सातारा : जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी गळीत हंगाम संपला तरीही शेतकऱ्यांना ऊस बिले दिलेली नाहीत. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. गळीत हंगाम २०२४-२५ संपून जवळपास दोन महिने झाले आहेत. अनेक कारखान्यांनी कायद्याची पायमल्ली करून शेतकऱ्यांना उसाचे बिल दिलेले नाही. आता कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊस बिले नियमाप्रमाणे १५ टक्के विलंब व्याजासह जमा करावीत, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करू, असा इशारा संघटनेने निवेदनाद्वारे दिला.
‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे निवेदन दिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, साखर कारखान्यांनी शुगर केन कंट्रोल अॅक्टचा भंग करूनही त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही. ही बाब गंभीर आहे. शेतकरी संकटांचा सामना करत आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व शेतीपंपाची वीजबिले माफ करण्याचे जाहीर केले होते; परंतु निवडणुका संपल्यानंतर ही आश्वासने दूर सारली गेलेली आहेत.
ऊस गळीत हंगाम संपल्यानंतर १५ दिवसांत साखर आयुक्त कार्यालयाकडे सर्व हिशोब देऊन आरएसएस सूत्रांनुसार अंतिम बिल शेतकऱ्यांना देणे गरजेचे होते. तसे न झाल्याने कारखान्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी अर्जुन साळुंखे, मनोहर येवले, दादासाहेब यादव, जीवन शिर्के, रमेश पिसाळ, राजू घाडगे, मोहन घाडगे, सुधाकर शितोळे, संदीप काळंगे, विशाल गायकवाड, अमोल पवार, महादेव डोंगरे, जनार्दन आवारे आदी शेतकरी उपस्थित होते.