सातारा : रयत सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व सभासदांनी कारखान्याचे ‘लोकनेते विलासकाका पाटील’ असे नामकरण करण्याच्या ठरावास मंजुरी दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष अॅड. उदयसिह पाटील उंडाळकर होते. शेवाळेवाडी – म्हासोली येथे कारखाना कार्यस्थळावर ही सभा पार पडली. कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब गरुड, अथणी रयतचे युनिट हेड रवींद्र देशमुख, लक्ष्मण देसाई, अनिल मोहिते, रोहित पाटील शहाजी शेवाळे, प्रकाश पाटील, प्रा.धनाजी काटकर प्रमुख उपस्थित होते.
सभेत अध्यक्ष उदयसिंह पाटील म्हणाले की, गेल्यावर्षीपासून कारखान्यात पाच हजार मेट्रिक टन क्षमतेने गाळप व वीज प्रकल्प सुरू झाला आहे. चालू गळीत हंगामात कारखान्याने गाळपास आलेल्या उसाला तालुक्यात उच्चांकी असा प्रतिटन ३ हजार १५० असा एकरकमी भाव दिला आहे. आता सभासद भाग भांडवलाच्या माध्यमातून १४ ते १५ कोटी रक्कम जमा करून डिस्टिलरी प्रकल्प सुरु केला जाईल. १५ हजार भागभांडवल पूर्ण करणाऱ्या सभासदास सवलतीच्या दरात पाचऐवजी ५० किलो साखर दिली जाईल आणि १५ ऑक्टोबरपर्यंत रक्कम भरणाऱ्या सभासदास दीपावलीला साखर उपलब्ध केली जाणार असे यावेळी सांगण्यात आले. रवींद्र देशमुख यांनी ऊस उपलब्धतेची माहिती दिली. संचालक प्रदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. शंकरराव लोकरे यांनी आभार मानले.