सातारा : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार श्रीराम सहकारी साखर कारखान्यावरून प्रशासक हटवून कारखान्याचा कार्यभार संचालक मंडळाकडे देण्यात आला आहे. कारखान्याचा ताबा प्रशासकाकडून संचालक मंडळाकडे सुपूर्द करण्याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे, उपाध्यक्ष नितीन भोसले यांच्यासह विविध संचालक उपस्थित होते. यावेळी गेले सात दिवस साखर कारखान्याचा कारभार प्रशासक म्हणून प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांनी बघितलेला आहे. कारखान्यात भ्रष्टाचार केल्याचा विरोधक जो आरोप आमच्यावर करतात, त्यांनी प्रांतांधिकाऱ्यांनाच विचारावे असा टोला अध्यक्ष डॉ. शेंडे यांनी लगावला.
अध्यक्ष शेंडे म्हणाले की, श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया रखडली असून, याबाबत उच्च न्यायालयामध्ये विविध याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. या सर्व याचिका एकत्रित करत उच्च न्यायालयाने सुनावणी घेतलेली आहे. पहिल्या झालेल्या सुनावणीमध्ये प्रशासकाची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश देत पुढील होणाऱ्या सुनावणीमध्ये कारखाना निवडणुकीबाबत उच्च न्यायालय जे निर्णय देतील त्यानुसार निवडणूक प्रक्रिया होईल. विरोधक कायमच कारखान्यामध्ये भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप आमच्यावर करत असतात; परंतु कारखान्यावर प्रशासक नियुक्ती झाल्यानंतर प्रशासकांनी कारखान्याची सर्व बँक खातेसुद्धा सील केलेले होते. त्यानंतर सर्व खात्यांची स्टेटमेंट ही प्रशासक म्हणून प्रांताधिकारी यांनी तपासले आहे.