सातारा : जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केलेला नाही, असा आरोप शेतकरी संघटनांनी केला होता. याबाबत पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी बैठक घ्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार गुरुवारी, दि. ३० रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी साताऱ्यातील नियोजन भवनात संघटनांचे प्रतिनिधी, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत ऊस दराचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.
साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होऊन महिनाभराचा कालावधी झाला आहे. मात्र, उसाला चांगली एफआरपी मिळावी, यासाठी शेतकरी संघटनांच्यावतीने आंदोलने सुरू आहेत. संघटनांकडून ऊस वाहतुकीची वाहने अडवली जात आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि साखर कारखान्यांचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीत यंदाच्या हंगामातील ऊसदराचा तोडगा निघेल, अशी आशा आहे, असे बळीराजा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी ११ वाजता नियोजन भवनमध्ये बैठक होत आहे. बैठकीस बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास जाधव, शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल खराडे, शेतकरी संघटना किसान मंचचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जाधव आदींसह पदाधिकारी उपस्थित राहतील. बैठकीस कारखानदारांनी प्रतिनिधी पाठवू नये, स्वतः उपस्थित राहण्याचे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.