सातारा : ऊस तोड मजुराच्या १२ जोड्या देतो असे सांगून तांबवे (ता. कराड) येथील ट्रॅक्टर मालकाची १० लाख २५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी कराड तालुका पोलिस ठाण्यात नंदुरबार जिल्ह्यातील दोन ऊसतोड मजूर टोळी मुकादमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश सरदार भिल्ल-पावरा (वय ३७, रा. कात्रा राजवाडी, अकरणी-नंदुरबार) व दोन्ह्या माध्या पावरा (रा. तेलखेडी मांडवी बु. अकरणी, नंदुरबार) या दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राहुल रघुनाथ ताटे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, राहुल ताटे यांचे दोन ट्रॅक्टर आहेत. त्यांना रमेश भिल्ल पावरा व दोन्ह्या पावरा या दोन टोळी मुकादमांनी मजूर देतो असे सांगितले. त्यांनी मजुरांच्या १२ जोड्या देत असल्याचे सांगत ताटे यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यानुसार ताटे यांनी संबंधित दोघांच्या नावावर १० लाख २५ हजार रुपये पाठवले. करारही करुन ताटे यांच्याकडे मजूर आलेच नाहीत. दोन्ही मुकादमांनी फोनही उचलणे बंद केले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे ताटे यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तालुका पोलिस ठाण्यात संबंधित दोन मुकादमांविरोधात फसवणुकीची तक्रार दिली आहे.