सातारा: जिल्ह्यातील १८ साखर कारखान्यांपैकी किसन वीर भुईंज, किसन वीर खंडाळा साखर कारखाना, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखाना, ग्रीन पॉवर गोपूज, प्रतापगड सहकारी या साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची ऊसाची बिले थकली आहेत. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या पाच कारखान्यांनी मागील हंगामात थकीत असलेली ऊस बिले ३१ ऑगस्टपर्यंत देऊ, असे आश्वासन दिले. या कारखान्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
बैठकीला जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी, लेखा विभागाचे संजय गोंदे,जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक, साखर आयुक्त कार्यालय व लेखा विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी राजू शेळके,अर्जुनराव साळुंखे यांनी शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलाचा मुद्दा मांडला. काही कारखान्यांनी बैठकीला येण्यापूर्वीच थकीत रकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केल्या. उर्वरीत पाच कारखान्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत सर्व रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्या जातील, असे सांगितले. किसन वीर कारखान्यावर आरआरसीची कारवाई करण्याचे आदेश असूनही टाळाटाळ करणाऱ्या वाईच्या प्रांताधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी केली.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.