सातारा : तब्बल २५ वर्षांनंतर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत आहे. निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचे पी. डी. पाटील पॅनेल, आमदार मनोज घोरपडे आणि अँड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांचे (स्व.) यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनल आणि काँग्रेसचे निवास थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ यांच्या (स्व.) यशवंतराव चव्हाण सह्याद्री शेतकरी परिवर्तन पॅनलमध्ये प्रमुख लढत होत आहे. सातारा, कऱ्हाड, खटाव, कडेगाव, कोरेगाव या तालुक्यातील २३४ गावांत कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. निवडणुकीसाठी ३२,२०५ मतदार पात्र असून, पाच एप्रिलला मतदान होणार आहे.
दुरंगी निवडणूक होईल असे वाटत असताना अर्ज माघारीदिवशी विरोधकांत फूट पडून तिसरे पॅनेल तयार झाले. मतदानासाठी अवघे दोनच दिवस राहिल्याने चुरस वाढली आहे. तिन्ही पॅनलकडून जाहीर प्रचार सभा वैयक्तिक गाठीभेटीवर जोर दिला आहे. पाच एप्रिलला सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होईल. मतदानासाठी दोनच दिवस बाकी आहेत. त्यामुळे मतदारांपर्यंत आपल्या पॅनलचे चिन्ह पोहोचविण्यासाठी उमेदवारांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सह्याद्री कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील मोठ्या गावातील उसाचे क्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे त्या मोठ्या गावात मतदारांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील मोठी गावे पॅनल प्रमुख आणि उमेदवारांकडून टार्गेट केली आहेत.