सातारा – सह्याद्री कारखान्यासाठी आज मतदान; नेत्यांची प्रतिष्ठा परिक्षा, तिरंगी लढतीमुळे मोठी चुरस

सातारा : यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तब्बल २५ वर्षांनंतर तिरंगी होत आहे. त्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे. निवडणुकीत कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील, आमदार मनोज घोरपडे, ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, निवास थोरात, रामकृष्ण वेताळ यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. निवडणुकीच्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज झाली असून, उद्या (शनिवारी) पाच तालुक्यांतील ६८ गावांतील ९९ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. त्यासाठी सहकार विभागाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

सत्ताधारी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचे पी. डी. पाटील पॅनेल, आमदार मनोज घोरपडे आणि ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनेल आणि काँग्रेसचे निवास थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ यांच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री शेतकरी परिवर्तन पॅनेलमध्ये प्रमुख लढत होत आहे.

कारखान्यासाठी कऱ्हाड गटात पाच हजार ११९, तळबीड गटात पाच हजार ५४३, उंब्रज गटात सहा हजार १६५, कोपर्डे हवेली गटात पाच हजार ६९, मसूर गटात पाच हजार २४७, वाठार किरोली गटात पाच हजार ६२ असे ३२ हजार २०५ एकूण मतदार आहेत. या निवडणुकीत २१ संचालक निवडण्यासाठी होणार आहे. त्यात प्रत्येक गटाची मतपत्रिका वेगळी असणार आहे. मतदानासाठी १४ पैकी एक ओळखपत्राशिवाय मतदान करता येणार नाही. मतदार सोडून इतर कोणीही व्यक्तींनी मतदान केंद्र परिसरात प्रवेश देण्यात येणार नाही. मतदान केंद्रात प्रवेश करताना मोबाईलही नेता येणार नाही, असे निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रीक यांनी सांगितले.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

सह्याद्री कारखान्यासाठी पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक राजू ताशीलदार, तालुका पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्याबरोबरच तळबीड, मसूर, उंब्रज, खटाव, कोरेगाव, सातारा, कडेगाव पोलिस ठाण्याचे १३४ पोलिस कर्मचारी, १८ सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, ९० होमगार्ड, दंगा काबू पथकाचे अधिकारी आणि २० जवान तैनात करण्यात आले आहेत.

एका मतदाराला १० मतपत्रिका

सह्याद्री निवडणुकीची कारखान्याच्या मतदान प्रक्रिया मतपत्रिकेच्या माध्यमातून होणार आहे. प्रत्येक मतदाराला एकूण दहा मतपत्रिका देण्यात येतील. त्यावर मतदारांनी मतदान कक्षामध्ये जाऊन बाणफुलीचा शिक्का मारून मतदान नोंदवणे आवश्यक आहे. मतदाराने मतदान करताना गोपनीयता राखणे गरजेचे आहे. गोपनीयतेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे.

संवेदनशील पाच गावांवर विशेष लक्ष

सह्याद्री कारखाना कार्यक्षेत्रातील किवळ, मसूर, पाली, कञ्हाड शहर, कोपर्डे हवेली ही मतदान केंद्र संवेदनशील असल्याची नोंद पोलिस दप्तरी झाली आहे. तेथे पोलिस दलाकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी नियमीत बदोबस्तासह स्वतंत्र अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही फौजफाटा तैनात असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here