नवी दिल्ली : सध्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आणखी दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. कारण देशात जुलै महिन्यात पावसात वाढ होवू शकते, असा अंदाज खासगी हवामान एजन्सी स्कायमेटने वर्तवला आहे. यंदा मान्सूनची सुरुवात कमकुवत झाली आहे. तथापि जुलै महिन्याच्या पहिल्या १० दिवसांत समाधानकारक पाऊस पडेल, असा अनुमान स्कायमेटच्या हवामानशास्त्र आणि हवामान बदल विभागाचे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी व्यक्त केला आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनमध्ये अडथळा आला होता. मात्र, आता वारे पुन्हा मजबूत होत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
सीएनबीसी-टीव्ही१८शी बोलताना उपाध्यक्ष पलावत म्हणाले की, बिपरजॉय चक्रीवादळाने पाऊस इतका कमकुवत होईल, अशी अपेक्षा नव्हती. या चक्रीवादळाने आर्द्रता घटल्याने मान्सून सुरू होण्यास उशीर झाला. परंतु आता स्थिती बदलत आहे. सद्यस्थितीत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी आणखी तीन ते चार दिवस लागतील. त्यानंतर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये त्याचा प्रवास होईल. या सर्व भागात चांगला पाऊस पडेल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
दरम्यान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, १६ जून रोजी संपलेल्या आठवड्यात ४९.४८ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली. गेल्यावर्षी समान कालावधीत झालेल्या पेरणीपेक्षा हे प्रमाण तब्बल ४९ टक्के कमी आहे. पेरण्यासाठी लांबल्या असल्या तरी आणखी तीन ते चार दिवस थांबावे लागेल, असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात मान्सून दक्षिण कोकणात, रत्नागिरीपर्यंत पोहोचला. मान्सून ११ जून रोजी रत्नागिरीत दाखल झाला. मात्र, नंतर त्याची चाल मंदावली, असे आयएमडीच्या शास्त्रज्ञ डॉ. सुषमा नायर यांनी सांगितले. नैऋत्य मान्सून पुढील तीन-चार दिवसांत पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता आहे. पूर्व-मध्य आणि दक्षिण द्वीपकल्पीय क्षेत्रावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे, असेही आयएमडीने स्पष्ट केले आहे.
डॉ. नायर म्हणाल्या की, बिपरजॉयमुळे मान्सूनमध्ये अडथळा आला होता. पुढील दोन ते तीन दिवसात परिस्थिती अनुकूल होईल, अशी अपेक्षा आहे. जूनमध्ये संपूर्ण विभागात पावसाची तूट दिसून आली. परंतु येत्या दोन-तीन दिवसांत परिस्थिती बदलेल, अशी आशा आहे.