पुणे : विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने केवळ शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे. सत्यशील शेरकर यांनी विविध पक्षांच्या, भिन्न विचारांच्या लोकांना सोबत घेऊन कारखाना प्रगतीपथावर नेल्याचे प्रतिपादन सह्याद्री देवराईचे संस्थापक व अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले. साखर कारखान्याला राजकारणापासून दूर ठेऊन सत्यशील शेरकर यांनी चांगला पायंडा पाडल्याचे गौरवोद्गारही शिंदे यांनी काढले.
श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ऊस विकास योजनेंतर्गत शेतकरी मेळावा व बुलेट लकी ड्रॉ सोडत कार्यक्रम गुरुवारी (दि.२१) श्री क्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहर सांस्कृतिक भवन या ठिकाणी पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अतुल बेनके, ‘विघ्नहर’चे अध्यक्ष सत्यशिल शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप, कार्यकारी संचालक भास्कर मुले, माजी आमदार शरद सोनवणे, बाळासाहेब दांगट, भाजप नेत्या आशा बुचके, राजश्री बोरकर, माऊली खंडागळे, पांडुरंग पवार, अनिलतात्या मेहेर, किशोर दांगट, संचालक मंडळ सदस्य, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, कारखान्याचे सभासद व ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विघ्नहर कारखान्याने ऊस लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस योजना जाहीर केली होती. या शेतकरी मेळाव्यामध्ये ८ हजार ५४७ शेतकऱ्यांमधून १४ भाग्यवान विजेते निवडण्यात आले. त्यामध्ये ६११ शेतकऱ्यांचा एक ग्रुप असे ७ ग्रुप व ६१० शेतकऱ्यांचा एक ग्रुप असे ७ ग्रुप अशाप्रकारे ८ हजार ५४७ ऊस उत्पादक शेतकरी १४ ग्रुपमध्ये विभागणी करण्यात आले होते. एकाच वेळी शेतकऱ्यांना १४ बुलेट वाटणारा विघ्नहर कारखाना महाराष्ट्रातील एकमेव कारखाना ठरला आहे.