पुणे : निवृत्तीनगर- धालेवाडी (ता. जुन्नर) येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सत्यशील शेरकर व उपाध्यक्षपदी अशोक घोलप यांची बिनविरोध निवड झाली. श्री विघ्नहर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या नेतृत्वाखालील शिवनेर पॅनेलचे १७ उमेदवार बिनविरोध निवडून आलेले होते, तर चार उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले होते. सोमवारी (ता. २४) सकाळी ११ वाजता कारखान्याच्या सभागृहात कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी नवनिर्वाचित संचालक मंडळाची सभा झाली. यावेळी दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक एक अर्ज आल्याने अध्यासी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी शेरकर व घोलप यांची बिनविरोध निवड जाहीर केली. अध्यक्षपदासाठी सत्यशील शेरकर यांना संचालक संतोष खैरे सूचक; तर विवेक काकडे अनुमोदक होते. उपाध्यक्षपदासाठी अशोक घोलप यांना संचालक धनंजय डुंबरे सूचक व देवेंद्र खिलारी अनुमोदक होते. या सभेस सर्व संचालक उपस्थित होते. नायब तहसीलदार सचिन मुंढे यांनी निवडणूक कामकाजासाठी सहकार्य केले. या निवडीमुळे सत्यशील शेरकर यांची अध्यक्षपदाची, तर घोलप यांची उपाध्यक्षपदाची हॅटट्रिक झाली आहे.
यावेळी शेरकर म्हणाले, शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, हा कारखान्याचे संस्थापक व माजी खासदार स्व. निवृत्तिशेठ व माजी अध्यक्ष स्व. सोपनशेठ यांचा विचार व ध्येय समोर ठेवून सभासद शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून आजपर्यंत कारखान्याच्या आजी माजी संचालक मंडळाने वाटचाल केली आहे. जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील शेतकरी व विघ्नहर परिवार आणि शेरकर घराण्याचे नाते नेहमी जिव्हाळ्याचे राहिले आहे. सभासद शेतकरी बांधवांच्या हितासाठी कायम कटिबद्ध राहील. आपला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी अविरत प्रयत्न करेल. ही जबाबदारी केवळ एक पद नाही तर सभासद शेतकरी बांधवांचे हित, कामगारांचे कल्याण आणि कारखान्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण सर्वांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाचे प्रतिक आहे. कारखान्याचा विकास अधिक गतिमान करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक अवलंब करणे आणि शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर उपक्रम राबवणे, याला सर्वोच्च प्राधान्य असेल.” कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी आभार मानले.