पुणे : सांगली जिल्ह्यातील सावळवाडी (ता. मिरज) येथील ऊस उत्पादक शेतकरी प्रशांत लटपटे यांनी 42 गुंठ्यात 174 टन 685 किलोंइतके ऊस उत्पादन घेतले. या मोठ्या उत्पादनामुळे साखर आयुक्त सौरभ राव यांनी सांगली गाठत संबंधित शेतकर्याच्या शेतावर जावून प्रयोगाची माहिती घेतली आणि त्यांचा सत्कार केला.
यावेळी बोलताना प्रशांत लटपटे म्हणाले, राज्याचे साखर आयुक्त सौरभ राव हे माझ्या ऊस शेतीला भेट देणार म्हणून मला सांगण्यात आले. त्यावेळी माझ्या कुटुंबाला आनंद झाला. 30 वर्षे ऊसशेती करीत आहे. दरवर्षी नवनवे प्रयोग करीत मी यंदा 42 गुंठ्यात 174 टन 685 किलोंइतके विक्रमी ऊस उत्पादन मिळविले. यात सर्व कुटुंबियांचा वाटा आहे. राज्याच्या साखर आयुक्तांच्या शाबासकीमुळे माझ्या कुटुबांच्या कष्टाचे सार्थक झाले. यंदा मी एकरी 200 टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवलले आहे.
यावेळी बोलताना सौरभ राव म्हणाले, संबंधित शेतकर्याने घेतलेले ऊस उत्पादन आणि शेतावर घेतलेल्या प्रयोगाची पाहणी करण्यासाठी 26 फेब्रुवारी रोजी मी सांगलीला भेट दिली . संबंधित प्रशांत लटपटे या ऊस उत्पादक शेतकर्याच्या अनेक वर्षाच्या कष्टानंतर त्यांनी हे यश गाठले आहे. शेताची पाहणी केल्यानंतर साखर आयुक्तालयाकडून प्रयोगशील ऊस उत्पादक म्हणून त्यांनी त्यांचा सत्कार केला. ते पाहून अन्य शेतकरीही याकडे वळावेत, अशी भावना असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.