हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
अमृतसर (यूएनआय) : दिवसेंदिवस घसरत चाललेली भूजल पातळी लक्षात घेऊन पंजाब सरकारने एक आश्वासक पाऊल उचलले आहे. मुख्य सचिव कर्ण अवतार सिंह यांनी जमिनीतील पाण्याचा उपसा टाळणाऱ्या शेतकऱ्यांना रोख बक्षीस देण्याची योजना जाहीर केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या लाईट बिलावरून आणि ट्युबवेल मीटर वरून त्याच्या पाणी वापराची मोजणी करण्यात येणार आहे. ‘पाणी बचाओ पैसा कमाओ’, असं या योजनेचं नाव आहे.
मुख्यसचिव सिह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येत आहे. त्यासाठी २०० वीज फिडर निवडण्यात आले आहेत. या फिडरवरून कमी पाणी वापरणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या ट्युवबेल मीटरवर वापर झालेल्या वीजेच्या बिलातून किती बचत झाली, त्यानुसार त्यांच्या खात्यात पैसे वर्ग केले जाणार आहेत. जो शेतकरी कमी पाणी वापरेल, त्याची तेवढी बचत होणार आहे.
राज्यातील रेती उपशाबाबत मुख्य सचिवांनी घोषणा केली आहे. या संदर्भात लवकरच टेंडर प्रक्रिया राबवण्यात येणार असून, त्यानतंर लगेचच उपसा सुरू करण्यास अनुमती देण्यात येणार आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामात सुधारणा करण्यासाठी लवकरच त्यांना आधुनिक स्मार्टफोन देण्यात येणार आहेत.