नवी दिल्ली : चीनी मंडी
अतिरिक्त साखर उत्पादनामुळे चिंतेत असलेल्या जागतिक साखर उद्योगाला भविष्यात एका वेगळ्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. २०१९-२०च्या हंगामात जागतिक बाजारात साखरेचा तुटवडा जाणवणार आहे. अतिरिक्त उत्पादनामुळे ब्राझील आणि युरोपियन युनियनने साखर उत्पादनात केलेली कपात याचा परिणाम बाजारावर दिसणार आहे. बाजारात २० लाख टन साखरेचा तुटवडा जाणवेल, त्याचवेळी २०१८-१९ च्या हंगामात ४० ते ५० लाख टन साखरेचे अतिरिक्त उत्पादन होण्याची शक्यता आहे.
बाजारपेठेत फेब्रुवारीपासून साखरेच्या दरांची मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. त्याचा परिणाम पुढच्या हंगामावर होताना दिसत आहे. विशेषतः ब्राझीलने साखर उत्पादनात मोठी कपात करून उपलब्ध ऊस इथेनॉल उत्पादनाकडे वळवला आहे. ब्राझीलच्या दक्षिण भागातील साखर पट्ट्यातून २०१९-२०च्या हंगामात सुमारे २६ लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. अर्थातच हा आकडा कमी आहे.
दरम्यान, युरोपिय संघाने समतोल राखत साखर उत्पादन १७ लाख टनापर्यंत कमी केले आहे. गेल्या २०१७-१८च्या हंगामात निर्यात कोटा आणि उत्पादनाची मर्यादा हटविल्यानंतर साखर उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले होते.
या संदर्भात जेनकिन्स या साखर व्यवसायिक कंपनीने म्हटले आहे की, युरोपमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या बिटाला चांगला भाव मिळालेला नाही. त्यामुळे लागवडच कमी होणार आहे. शेतकऱ्यांना बिटापेक्षा गव्हाला चांगले पैसे मिळत आहेत. भारतातही दोन चांगल्या हंगामांनंतर २०१९-२०च्या हंगामात उत्पादन घटण्याची शक्यता आहे. पण, भारतात गरजेपेक्षा जास्त साखर उत्पादन सुरूच राहील. जगात सर्वाधिक साखरेची मागणी असलेल्या भारतात,२०१७-१८च्या ३२० लाख आणि २०१८-१९च्या ३५० लाख टन साखरेच्या तुलनेत साधारणपणे ३१० लाख टन उत्पादन होईल, असे जेनकिन्सचे म्हणणे आहे.
केंद्र सरकारने नुकत्याच दिलेल्या पॅकेजमुळे शेतकऱ्यांना ऊस लागवड करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. त्यामुळे भारतात ऊस लागवड होतच राहणार आहे. परिणामी साखर उत्पादन जास्तच होणार आहे.
दोन वर्षांच्या बंपर उत्पादनानंतर २०१९-२०च्या हंगामात साखरेच्या किमतीतही सुधारणा होण्याची शक्यता नाही. साखरेच्या मागणी मंदावली आहे, ही देखील चिंतेची बाब आहे. साखरेची मागणी दर वर्षी २ टक्क्यांनी वाढत होती ती आता एक ते दीड टक्क्यांवर आल्याचे दिसत आहे. अन्नपदार्थ आणि पेय निर्मात्यांनी त्यांच्या उत्पादनांमध्ये साखरेचा अंश कमी केल्याचा परिणाम दिसत आहे.