नवी दिल्ली : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) २०२१-२२ या हंगामात १५ नोव्हेंबरअखेर २०.९० लाख टन साखर उत्पादन झाल्याचे स्पष्ट केले आहे. तर गेल्यावर्षी समान कालावधीत १६.८२ लाख टन साखर उत्पादन झाले होते. गेल्यावर्षी १५ नोव्हेंबर २०२० अखेर २८९ कारखाने गाळप करीत होते. तर यंदा १५ नोव्हेंबर २०२१ अखेर ३०८ कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये ऑक्टोबर २०२१च्या तिसऱ्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाल्याने गळीत हंगाम सुरू करण्यात उशीर झाला आहे. सध्या ७४ कारखाने सुरू असून त्यांनी आतापर्यंत २.८८ लाख टन साखर उत्पादन केले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ७६ कारखाने सुरू होते. त्यांनी ४ लाख टन उसाचेगाळप केले होते.
दुसरीकडे इतर दोन प्रमुख राज्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकात ऑक्टोबर महिन्यात गळीत हंगाम चांगल्या पद्धतीने सुरू झाला आहे. महाराष्ट्रात १३४ कारखान्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत गाळप सुरू केले असून आतापर्यंत ८.९१ लाख टन साखर उत्पादन केले आहे. गेल्यावर्षी समान कालावधीत १२० कारखान्यांनी ६ लाख टन साखर उत्पादन केले होते. कर्नाटकमध्ये १५ नोव्हेंबरअखेर ६३ कारखाने सुरू असून ७.६२ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. गेल्यावर्षी समान कालावधीत ६० कारखान्यांनी ५.६६ लाख टन साखर उत्पादन केले होते. गुजरातमध्ये १४ कारखाने सुरू असून त्यांनी ७५,००० टन साखर उत्पादित केली आहे. गेल्यावर्षी या काळात १४ कारखान्यांनी ८०,००० टन साखर उत्पादन केले होते.
उत्तराखंड, बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणासारख्या इतर राज्यांत जवळपास २३ कारखाने सुरू आहेत. त्यांनी १५ नोव्हेंबरअखेर ७४,००० टन साखर उत्पादन केले आहे. बंदरांकडून मिळालेली माहिती आणि बाजारातील रिपोर्टनुसार आतापर्यंत २५ लाख टन साखर निर्यातीचे करार करण्यात आले आहेत. यामध्ये २.७ लाख टन साखर ऑक्टोबर महिन्यात निर्यात करण्यात आली आहे. गेल्यावर्षी या महिन्यात १.९६ लाख टन साखर निर्यात करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये आणखी २ टन साखर निर्यात होणार आहे.