नवी दिल्ली : देशभरातील ५३१ साखर कारखान्यांनी ३० एप्रिल २०२३ पर्यंत ३२०.३० लाख टन साखरे चे उत्पादन केले आहे.
नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव शुगर फेडरेशन (NFCSF) ने हंगामाच्या अखेरपर्यंत ३२७.३५ लाख टन साखर उत्पादन होण्याचे अनुमान व्यक्त केले आहे. देशात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि तामीळनाडी ही पाच राज्ये साखर उत्पादनात अग्रेसर आहेत. त्यानंतर हरियाणा, पंजाब आणि बिहारचा क्रमांक लागतो. महाराष्ट्राने सर्वाधिक १०५.३ लाख टनापेक्षा अधिक साखर उत्पादन केले आहे. देशातील ५३१ पैकी ६७ साखर कारखाने (३० एप्रिलपर्यंत) सुरू आहेत.
उत्तर प्रदेशने १०१.९० लाख टन साखर उत्पादन केले आहे. कर्नाटकमध्ये ५५.५० लाख टन आणि तामिळनाडू आणि गुजरातमध्ये अनुक्रमे १०.९५ लाख टन, १०.१० लाख टन उत्पादन झाले आहे. याशिवाय, हरियाणात (७.१५ लाख टन), पंजाबमध्ये (६.६५ लाख टन) आणि बिहारमध्ये (६.४० लाख टन) साखर उत्पादनात तेजी आली आहे. या राज्यांशिवाय मध्य प्रदेश (५ लाख टन), उत्तराखंड (४.७५ लाख टन), तेलंगाना (२.८० लाख टन), आंध्र प्रदेश (२.३० लाख टन) आणि इतर राज्यांत १.५० लाख टन साखर उत्पादन घेतले आहे.
देशात गुजरातचा सरासरी साखर उतारा १०.८० टक्के इतका असून हे राज्य सर्वात आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ कर्नाटक (१०.१० टक्के), तेलंगणा (१०.१० टक्के), महाराष्ट्र (१० टक्के), आंध्र प्रदेश (९.७० टक्के), बिहार (९.७० टक्के) आणि उत्तर प्रदेश (९.६५ टक्के) अशी क्रमवारी आहे.
या हंगामात ऊस गाळपात उत्तर प्रदेश (१०५५.९६ लाख टन) आणि त्यापाठोपाठ महाराष्ट्र (१०५३ लाख टन) आणि कर्नाटकमध्ये (५४९.५० लाख टन) झाले आहे. गाळपाची गती पाहता देशात सध्याचा साखर हंगाम मे अखेरपर्यंत सुरू राहिल आणि यामध्ये जवळपास ३२७.३५ लाख टन साखर उत्पादन होईल, असे अनुमान आहे. त्याशिवाय, जवळपास ४५ लाख टन साखरेला इथेनॉल उत्पादनमध्ये डायव्हर्ट केले जाईल, असेही अनुमान आहे.